पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इंजिनिअरिंग, चित्रकला, आर्किटेक्ट, विणकाम, रंगकाम या तंत्रशाखांचे शिक्षण दिले जाऊ लागले. कलाभवन ही विविध प्रकारचे तांत्रिक शिक्षण देणारी तत्कालीन भारतातील एक उत्तम पॉलीटेक्निक संस्था होती.
क्रांतिकारक खासेराव
 लंडनमध्ये असताना श्यामजी कृष्ण वर्मा व त्यांचा क्रांतिकारकांचा गट यांच्याशी खासेरावांची मैत्री झाली. केशवराव देशपांडे, गोविंदराव माडगावकर आणि अरविंद घोष यांच्यात त्यावेळी झालेली मैत्री आयुष्यभर टिकली. अरविंद घोष आणि केशवराव देशपांडे यांनाही बडोद्यात आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका खासेरावांची होती. त्याचप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने प्रयत्न करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना सयाजीराव खासेरावांमार्फत सहकार्य करत असत.

 खासेराव जाधव, त्यांचे लहान बंधू मेजर माधवराव, प्रो. माणिकराव यांनी अरविंद घोष बडोद्यात येण्यापूर्वी समविचारी मित्रांचा गट असणारी 'तरुणसंघ' नावाची संघटना स्थापन केली होती. संघटनेच्या सभासदांत बडोदा सरकारच्या नोकरीतील अनेक अधिकारी नोकर होते. खासेराव जाधवांच्या घरी या संघटनेच्या बैठका होत असत. पुढे अरविंद घोष व केशवराव देशपांडे बडोद्यात आल्यानंतर या संघटनेच्या कामास अधिक वेग आला. अरविंद घोष खासेरावांच्या घरीच राहू लागले. खासेराव

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १२