पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाधवांचे निवासस्थान हे क्रांतिकारकांचा अड्डा बनला. या ठिकाणी लोकमान्य टिळक, सयाजीराव, अरविंद घोष यांच्या भेटीगाठीतून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा आराखडा तयार होत गेला. खासेरावांवर लोकमान्य टिळकांच्या विचारांचाही प्रभाव होता. खासेरावांच्या पुढाकाराने बडोद्यात गणेशोत्सव, शिवजयंती हे राष्ट्रप्रेमाच्या निमित्त होणारे कार्यक्रम सुरू झाले.
 अरविंद घोष यांच्या कल्पनेतून आणि सयाजीरावांच्या पाठिब्याने नर्मदाकाठी 'भारतीय गंगनाथ राष्ट्रीय विद्यालया'ची स्थापना करण्यात आली. अरविंद घोष, खासेराव जाधव, केशवराव देशपांडे आणि प्रा. माणिकराव हे या राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक होते. राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले देशभक्त तयार करण्याच्या उद्देशाने १७ मे १९०५ या दिवशी राष्ट्रीय विद्यालयाची सुरुवात झाली. या ठिकाणी राष्ट्रप्रेम, शारीरिक शिक्षण, सांस्कृतिक वारसा आणि शस्त्रांची उपासना शिकविली जाई. त्याचबरोबर देशभरातील राष्ट्रीय विचारांच्या देशभक्तांना येथे बोलावून त्यांच्या भाषणांचे आयोजनही केले जात असे.

 खासेराव जाधव, बॅरिस्टर केशवराव देशपांडे आणि त्यांचे मित्र या विद्यालयाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. केशवराव तर आपल्या पगारातील काही रक्कम या विद्यालयात द्यायचे. थोड्याच काळात बडोद्यातील हे विद्यालय राष्ट्रीय घडामोडींचे प्रमुख केंद्र बनले. परंतु ब्रिटिश सरकारला हे विद्यालय राजद्रोह

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १३