पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



वाटू लागले. ब्रिटिश सरकारच्या वाढत्या दबावामुळे डिसेंबर १९११ ला हे विद्यालय बंद करण्यात आले.
 आपल्या देशाचा उद्धार सर्व जाती-धर्माची माणसेच करतील. आपला देश स्वतंत्र विचारसंपन्न राष्ट्राच्या पंगतीला येण्यासाठी, सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे खासेरावांचे ठाम मत होते. यासाठी तरुणांना सैनिकी शिक्षण देणे आवश्यक आहे. ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्यासाठी बंडखोर देशभक्तांची आणि सैनिकांची संख्या वाढली पाहिजे असे त्यांना वाटे. यासाठीच खासेराव आणि अरविंद घोषांनी महाराजांच्या सहकार्याने बडोद्यात एक महत्त्वाची क्रांतिकारी घटना घडवून आणली. खासेरावांचे लहान बंधू माधवराव जाधव हे बडोदा सैन्यात मेजर होते. माधवरावांना स्विस सैनिकी प्रशिक्षणासाठी स्वित्झर्लंडला पाठविण्याची योजना बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष आणि खासेराव जाधवांनी तयार केली.

 नवीन शस्त्रांचा अभ्यास करणे, बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. या प्रशिक्षणासाठी सयाजीरावांनी माधवरावांना रजा मंजूर करून प्रशिक्षणाच्या खर्चाची तरतूदही केली. त्याचबरोबर बाळ गंगाधर टिळकांनी लंडनमधील क्रांतिकारी श्यामजी कृष्ण वर्मा यांना पत्र लिहून माधवरावांना प्रशिक्षण काळात पैसे कमी पडल्यास मदत करण्यास सांगितले. माधवरावांनी प्रशिक्षण पूर्ण करून येताना बरोबर सैनिकी व्यवस्थापनाची सुमारे दोनशे पुस्तके आणली.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १४