पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हाइसरॉय यांच्याकडून दबाव वाढू लागला. व्हाइसरॉय यांनी केशवराव देशपांडे आणि खासेराव जाधव यांना राज्याच्या सेवेतून काढून टाकण्याचा आदेश दिला. आपल्यामुळे महाराजांवर वरिष्ठ सत्ता नाराज आहे. यातून महाराजांवर संकटे वाढू नये म्हणून केशवराव देशपांडे यांनी स्वतःच नोकरीचा राजीनामा दिला. केशवरावांनी प्रामाणिकपणे राज्याची सेवा केल्याबद्दल सयाजीरावांनी त्यांना दहा हजार रुपये देऊन सेवामुक्त केले. दुसरे अधिकारी खासेराव यांनाही मुक्त करावे, हा ब्रिटिश सरकारचा आग्रह मात्र महाराजांनी धुडकावून लावला. सयाजीरावांनी खासेरावांची दुसऱ्या खात्यात तात्पुरती बदली केली. दोन वर्षे वार्षिक पगारवाढ रोखण्याचे नाटकी आदेश काढले. थोड्याच दिवसात सयाजीरावांनी हा निर्णय बदलला.
महाराष्ट्राचे हितचिंतक

 खासेरावांचे महाराष्ट्राला पहिले महत्त्वाचे योगदान म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेंना बडोद्याची शिष्यवृत्ती मिळवून देणे. शिंदेंना पदवी शिक्षणाला सयाजीरावांकडून शिष्यवृत्ती मिळवून देण्यामध्ये लक्ष्मणराव माने यांच्याबरोबर खासेरावांची भूमिकाही महत्त्वाची होती. ज्याप्रमाणे पुढे केळूसकर आणि यंदे यांच्यामुळे बाबासाहेबांना बडोद्याची शिष्यवृत्ती मिळाली. त्याचप्रमाणे १८९६ मध्ये शिंदेना शिष्यवृत्ती मिळवून देऊन अस्पृश्य उद्धाराच्या कामाची पार्श्वभूमी तयार करण्यामध्येही खासेरावांनी एकप्रकारे ऐतिहासिक योगदान दिले होते. यासंदर्भात गो. मा. पवार

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १६