पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणतात, “पुढची बी.ए. ची दोन वर्षे कशी जावी हा घोर तसाच राहिला. अशा परिस्थितीत त्यांना बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव महाराज यांची भेट घ्यावी असा विचार आला. बडोदा येथे श्री. लक्ष्मणराव माने व श्री. खासेराव जाधव या प्रतिष्ठित मराठा गृहस्थांशी त्यांचा परिचय झाला होता. या दोन सद्गृहस्थांच्या शिफारशीमुळेच महाराजांनी विठ्ठलरावांसारख्या विद्यार्थ्यांची गाठ घेतली.महाराजांनी त्यांना दरमहा पंचवीस रुपये स्कॉलरशिप दिली”

 खासेरावांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी केलेल्या कामाबाबत महाराष्ट्र अनभिज्ञ आहे. २०१५ मध्ये बाबा भांडयांनी खासेरावांचे पहिले चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्राचा हा ‘हिरा’ प्रकाशात आला. महात्मा फुल्यांनी सुरू केलेल्या बहुजन शिक्षणाच्या कार्याला महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अगोदर ४० वर्षे खासेरावांनी बडोद्यातून दिलेली गती बहुजन समाजाच्या इतिहासात नोंदवली गेलेली नाही. महाराष्ट्रातील मराठा जातीतील मुलांच्या शिक्षणासाठी एक संस्था असली पाहिजे या भूमिकेतून १०० वर्षापूर्वी जनरल नानासाहेब शिंदे यांना बरोबर घेऊन निधी संकलनाचे प्रयत्न खासेरावांनी बडोद्यात सुरू केले. या निधीला 'मराठा फंड' असे नाव होते. या कामासाठी सयाजीरावांनी मोठी रक्कम दिली. यामध्ये खासेरावांनी स्वत: चे २५ हजार रुपये घातले. समाजातील आर्थिक स्थिती चांगली असलेल्या मंडळींकडून या फंडासाठी मदत मिळवण्याचा

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १७