पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी चिकाटी न सोडता आपले प्रयत्न चालू ठेवले. यासाठी १९०३ मध्ये मुंबई येथील मराठा समाजाच्या मंडळींनी मराठा शिक्षण परिषद घेण्यासाठी पहिली बैठक बोलावली.
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद

 पुढे २१ ऑक्टोबर १९०६ मध्ये मुंबई येथे 'रावबहादुर घमाजी मनाजी रुकारे यांच्या घरी यासंदर्भात पुन्हा बैठक झाली. या बैठकीला रावबहादुर विठ्ठल रामचंद्रराव वंडेकर, वासुदेव लिंगोजी बिर्जे, नारायण पोवार, दाजीराव दळवी तसेच बडोद्याहून खासेराव जाधव, गुणाजी निंबाळकर, भगवंतराव पाळेकर, कोल्हापूरचे भास्करराव जाधव उपस्थित होते. यावेळी धारवाड मराठी शिक्षण फंडाचे गणपतराव रामचंद्र माने यांनी धारवाड येथे मराठा शिक्षण परिषद घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे पहिली अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद १९०७ मध्ये धारवाड येथे घेण्याचे निश्चित झाले. या पहिल्या परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत वि.द. घाटे म्हणतात, “या पहिल्या अ.भा.म. शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी स्वीकारावे, अशी सर्वांची इच्छा होती. महाराज गेले वर्षभर प्रकृती स्वास्थ्यासाठी परदेशात असल्यामुळे त्यांची संमती घेणे आवश्यक होते. महाराजांना हिंदुस्थानात परतण्यास विलंब असल्याने ३० डिसेंबर, १९०७ ला धारवाडच्या अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते खासेराव जाधव

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / १८