पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती आणि सयाजीरावांचा त्याला मुक्त पाठिंबा होता. सयाजीरावांनी बडोद्यामध्ये मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधी उभा केला. विशेष म्हणजे या निधीतून मुलांबरोबर मुलींनाही शिष्यवृत्ती देण्याचे धोरण होते. पुढे १९१४ च्या पुणे येथील अधिवेशनात अस्पृश्य मुलांना मराठ्यांच्या शिक्षण संस्थेत प्रवेश देण्याचा ठराव पास झाला. त्यामुळे जरी या परिषदेच्या नावात 'मराठा' हा शब्द आला असला तरी तो व्यापक अर्थाने आला होता असे म्हणावे लागेल. परिषदेचा हा ठराव सयाजीराव आणि खासेराव यांच्या धोरणाशी सुसंगत होता हे विशेष.

 मराठा शिक्षण परिषदेच्या माध्यमातून खासेरावांनी ब्राम्हणेतर मुलांसाठी शिक्षण प्रसाराचे काम केले. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक खर्च करण्याची ऐपत नव्हती, अशा शेकडो विद्यार्थ्यांना बडोद्यातून शिष्यवृत्ती देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्याचबरोबर ज्या मराठा समाजातील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ते मुलांना परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देत नसत, अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्याचा प्रयत्न खासेराव करायचे. खासेरावांनी ग्वाल्हेरचे बॅ. विनायकराव पवार आणि अमरावतीचे बॅ. रामराव देशमुख या दोघांना आग्रहाने परदेशी शिक्षणासाठी पाठवले. अमरावतीच्या ज्ञानोबा मोहिते यांना बडोद्याची शिष्यवृत्ती मिळवून दिली. ही शिष्यवृत्ती देताना शिक्षण पूर्ण झाल्यावर अमरावतीच्या शिवाजी मराठा सोसायटीच्या शिक्षण प्रसाराचे काम करण्याची

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २१