पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्य समाजाला पाठबळ
 मानव कल्याणासाठी अविरत कार्य करणाऱ्या सत्यशोधक समाज, प्रार्थना समाज आणि आर्य समाजाला महाराजांचा राजाश्रय होता. आर्य समाजाच्या स्वामी नित्यानंद, स्वामी विश्वेश्वरानंद यांच्या भेटीतून खासेराव या महत्त्वाच्या संघटनेकडे ओढले गेले. सयाजीरावांचा राजाश्रय लाभल्याने संपतराव गायकवाड आणि खासेराव जाधव हे बडोद्यातील आर्य समाजाचे आधारस्तंभ बनले. महाराजांनी १८८२ मध्ये बडोद्यात अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली. पण त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बहुजन व उच्चवर्णीय शिक्षक मिळेना. या कामासाठी त्यांना मुस्लिम समाजातील शिक्षक नेमावे लागले. पुढे महाराजांनी आर्य समाजाचे स्वामी नित्यानंद यांना शिक्षण विभागात कार्य करण्यासाठी एक कार्यकर्ता पाठविण्याची विनंती केली. त्यानुसार १९०८ मध्ये स्वामी नित्यानंद यांनी पंडित आत्माराम या विद्वान पंडितास पंजाबमधून बडोद्यात पाठविले. महाराजांनी त्यांची अस्पृश्य शाळांचे इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक केली.

 खासेराव बडोद्यातील आर्य समाजाचे कार्य पाहू लागल्यापासून महिन्याला दहा रुपये सेवा म्हणून जमा करू लागले. या पैशातून आर्य समाजाच्या कार्यालयासाठी शिवाजी रोडवर दांडिया बाजारात जागा भाड्याने घेतली. खासेराव आणि पं. आत्माराम यांनी अस्पृश्य आदिवासींच्या शिक्षणाच्या, वसतिगृहाच्या

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २३