पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बहुजन पक्षाचा उमेदवार म्हणून जाहीरनामा तयार करण्यासाठी त्यांना मदत केली. दोन महिने पुण्यात येऊन राहिले. इतकेच नाही तर वि. रा. शिंदेंच्या निवडणूक खर्चाची सर्व जबाबदारी त्यांनी उचलली. बडोद्यातून येतानाच ते खर्चाची रक्कम घेऊन आले होते. पुण्यातील मराठा जातीच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन शिंदेना पाठिबा द्यावा यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले परंतु त्यांना यश आले नाही. यासंदर्भात गो. मा. पवार म्हणतात, “मात्र शिंदे यांचे मित्र खासेराव जाधव यांनी या निवडणुकीनिमित्त दोन महिने आपला मुक्काम पुण्यामध्ये ठेवला. शिंदे यांना म मिळावी यासाठी हिंडण्याचे परिश्रम घेतले व हजारो रुपयांचा खर्च केला. खासेराव जाधवांनी दाखवलेले प्रेम व केलेले कष्ट याबद्दल विठ्ठल रामजी शिंदे यांना त्यांच्याबद्दल अतिशय कृतज्ञता वाटली.”
पुण्याचे शिवस्मारक आणि खासेराव

 शिक्षणासाठी अग्रेसर असलेल्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे असे श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना वाटू लागले. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र, बडोदा, ग्वाल्हेर, भोपाळ, नागपूर येथील मराठा संस्थानिक आणि मराठा समाजाचे अधिकारी एकत्र आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पुण्यात एक बैठक झाली. ग्वाल्हेरचे श्री. माधवराव शिंदे या बैठकीस उपस्थित होते. माधवराव शिंदे

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २६