पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



जातींच्या मंडळींना स्मारक निधी समितीत घेतल्याबद्दल शिंदे सरकारचा जाहीर निषेधही केला.
 शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीसाठी खासेराव जाधव दोन महिने बडोद्याहून पुण्यात येऊन राहिले. स्मारकाविरुद्ध चुकीचे आरोप थांबवावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. खासेराव विरोध करणाऱ्या मराठा पुढाऱ्यांपुढे हात जोडून विनंती करू लागले. “तुम्ही जो विरोध करत आहात हा श्री. शिंदे सरकारांना नसून छत्रपती शिवरायांचा आणि सबंध मराठा समाजाचा हा अपमान आहे याची तुम्हाला कल्पना येत नाही. मराठ्यांनी जातीचा अभिमान बाळगावा; पण इतर जातींचा अनाठाई द्वेष करणे, हे शिवरायांच्या धोरणाविरुद्ध तुम्ही करत आहात. हा नाद सोडून द्या." परंतु मराठा पुढाऱ्यांनी खासेरावांची ही विनंती मान्य केली नाही. शेवटी महाराजा शिंदेंनी स्मारकाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मराठ्यांच्या आडमुठेपणाविषयी खासेरावांना वाईट वाटले आणि दुःखही झाले.

 महाराजा सयाजीराव आणि महाराष्ट्र हे नाते तपासत असताना एक बाब स्पष्ट होते ती अशी की, या नात्याला शेकडो पदर होते. त्यामुळे सयाजीरावांशी नाते सांगणारा प्रत्येक पदर डोळसपणे तपासल्याशिवाय जसा सयाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिपूर्ण वेध घेता येणार नाही, त्याचप्रमाणे सयाजीरावांच्या कार्याचा 'कॅन्व्हास' ही समजून घेता येत नाही. आपल्या प्रागतिक चळवळी आपण टोकाच्या व्यक्तिकेंद्री भूमिकेतून अभ्यासल्यामुळे या

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / २८