पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीरावांनी आपल्या ६४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत विविध क्षेत्रातील शेकडो देश विदेशातील विद्वानांशी संवाद ठेवला. अनेक गुणी लोक आपल्या प्रशासनात महत्त्वाच्या पदावर नेमले. त्यांना जपले, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपले राज्य सर्वोत्तम करण्यासाठी कौशल्याने करून घेतला. आपल्या राज्यातील कर्तबगार अधिकाऱ्यांचे पुतळे कीर्तीमंदिर उभा करून बसवले. खासेराव जाधव हे सयाजीरावांचे जवळचे नातेवाईक जसे होते तसेच सयाजीरावांशी अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. सयाजीरावांचे नातू आणि बडोद्याचे उत्तराधिकारी प्रतापसिंह यांच्या शिक्षणाचा आराखडा खासेरावांनी तयार केला होता. प्रतापसिंहांचे पालक झाल्यानंतर राजपुत्रांच्या शिक्षणासाठीची त्यांनी जी टाचणे काढली ती 'वेक अप प्रिंसेस' या नावाने ग्रंथबद्ध झाली. प्रतापसिंहांवर कुटुंब कलहातून विषप्रयोग होऊ शकतो ही शक्यता विचारात घेऊन खासेराव प्रतापसिंहांना जे अन्न-पाणी दिले जाई ते प्रथम स्वतः ग्रहण करू लागले. यातच एके दिवशी विषबाधा होऊन खासेरावांचा मृत्यू झाला. राजासाठी आणि राज्यासाठी स्वत:च्या प्राणाचे बलिदान देण्याची ही निष्ठा ज्या राज्याच्या सेवेतील लोकांची असते तेच राज्य महान राज्य होऊ शकते हेच यातून सिद्ध होते.

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / ७