पान:महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांचे जिवलग
 खासेराव जाधव सयाजीरावांचे नातेवाईक होते. सयाजीरावांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई यांचे वडील विश्वासराव माने हे खासेरावांचे मामा होते. खासेरावांचा जन्म रहिमतपूर या मामांच्या गावी २४ ऑगस्ट १८६४ ला झाला. आई गुजाबाई व वडील भगवंतराव यांना बाबूराव, खासेराव व माधवराव ही तीन मुले होती. खासेरावांना शिक्षणासाठी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ठेवले होते. मॅट्रिक परीक्षेनंतर खासेरावांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून इंटरमीजिएटची परीक्षा उत्तीर्ण केली. खासेरावांचे वडील भगवंतराव जाधव जमनाबाईंचे मानकरी असल्याने खासेराव उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत बडोद्याला येऊ लागले. या काळात त्यांचा मुक्काम राजवाड्यातच असे. यादरम्यान सयाजीराव, संपतराव, आनंदराव या राजपुत्रांशी खासेरावांचा स्नेह वाढत गेला.

 खासेराव जाधव आणि सयाजीराव यांच्यातील नाते तर फारच अनोखे आणि मैत्रीचे होते. ते सयाजीरावांचे नातेवाईक असण्याबरोबरच जिवलग मित्र आणि विश्वासू अधिकारीही होते. सयाजीरावांनी त्यांचे लहान बंधू संपतराव गायकवाड आणि खासेराव यांना १८८४ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. तेथे खासेरावांनी ऑक्सफर्डच्या कृषी महाविद्यालयात कृषिविषयक पदवी घेतली. १८९० मध्ये ते शिक्षण पूर्ण करून लंडनहून बडोद्याला आले. लंडनहून परत येताना त्यांनी तंत्रज्ञान,

महाराजा सयाजीराव आणि खासेराव जाधव / ८