पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिंगू ही प्रमुख मंडळी त्यांच्याबरोबर होती. १८८१ च्या जनगणना अहवालात मराठा जात शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मागास असल्याचे त्यांना आढळले. म्हणूनच त्यांनी सर डब्ल्यू. वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली मराठा जातीच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा करण्यासाठी सभा भरवली. पुढे १८८३ ला डेक्कन मराठा एज्युकेशन संस्थेची स्थापना झाली. स्थापनेपासूनच सयाजीरावांनी या संस्थेला २,४०० रु.चे वर्षासन दिले होते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनीही पुढे या संस्थेस आर्थिक साहाय्य केले होते.

 गंगारामभाऊ म्हस्के हा आधुनिक महाराष्ट्रातील पूर्णत: अज्ञात महानायक आहे. माझे हे विधान महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, चळवळीतील बुद्धिजीवी आणि शिक्षित वर्गाला चक्रावून सोडेल. परंतु आजच्या मराठा आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वाधिक योगदान देणाऱ्या गंगारामभाऊंचे पुनर्वाचन हे मराठ्यांबरोबर बुद्धिजीवींसाठी अनिवार्य आहे. गंगारामभाऊ हे सत्यशोधक समाजाचे सदस्य आणि हितचिंतक होते. म्हस्केंनी पुण्यामध्ये मराठा जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याच्या उद्देशाने १८८३ मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. यासंदर्भात तावडे म्हणतात, 'मराठा जातीत विद्येचा प्रसार न होण्यास त्यांची अनास्था व दारिद्र्य ही मुख्य होत, या अडचणी कै. म्हस्के यांच्या

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ११