पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्ण लक्षात येऊन त्यांनी १८८३ सालापासून हुशार व होतकरू मराठा विद्यार्थ्यांस स्कॉलरशिपरुपाने द्रव्यसाह्य करण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांनी अविश्रांत श्रम करून आपल्या मित्रमंडळींच्या व इतर समाजातील थोर मंडळींच्या साहाय्याने व सहानुभूतीने डेक्कन असोसिएशन ही संस्था स्थापन केली. याच वेळी मे.ली- वॉर्नरसाहेब, कै. रानडे व इतर समतावादी मंडळींचे या संस्थेस पूर्ण साह्य मिळाले. या संस्थेचा नामकरणविधी ता. ८ जानेवारी १८८३ मध्ये पुणे येथील हिराबागेतील टाऊन हॉलात सर वुल्यम वेडरबर्न यांचे अध्यक्षतेखाली झाला.' मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचा विकास तपासला असता जवळ-जवळ सर्व ज्ञानशाखांतील मराठ्यांमधील पदवीधरांची पहिली पिढी गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेली होती. इतकेच नव्हे तर बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर, कोल्हापूर या महत्त्वाच्या संस्थानांमधील प्रशासनात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे बहुतेक उच्चशिक्षित मराठे हे गंगारामभाऊंचे बौद्धिक 'उत्पादन' होते.

 याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या संस्थानचा विचार करावा लागेल. शाहू महाराजांच्या पुरोगामी धोरणाला कृतीत उतरविणाऱ्या काही व्यक्तींचा या दृष्टीने विचार करता येईल. यामध्ये भास्करराव जाधव हे एक महत्त्वाचे नाव. भास्करराव जाधवांना १८८८ ते १८९२ अशी पाच वर्षे गंगारामभाऊंची शिष्यवृत्ती होती. या काळात ते मुंबई

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १२