पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वरूपात करता आले नसते. हे या दोन संस्थांना महाराजांनी दिलेल्या आर्थिक मदतीवरून स्पष्ट होते. म्हणूनच सयाजीराव महाराज हे मराठ्यांच्या शैक्षणिक उन्नतीचे आधारवड होते.

 ज्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाची पार्श्वभूमी तयार केली त्याचप्रमाणे गंगारामभाऊंनी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामासाठी जमीन नांगरून ठेवली. लोकसंख्येत तसेच सामाजिक आणि राजकीय नेतृत्वात आघाडीवर असणाऱ्या मराठा जातीच्या उन्नतीसाठी पायाभूत काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्केंचे नावही आज महाराष्ट्रात कुणाला माहीत नाही. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचा 'तुटलेला' इतिहास 'जोडून ' तातडीने अभ्यासण्याची गरज आहे. सयाजीराव गायकवाड यांचे या संस्थेला स्थापनेपासूनच सर्वाधिक आर्थिक साहाय्य होते. या संस्थेची स्थापना करण्याचे निश्चित झाल्याबरोबर गंगारामभाऊंनी आर्थिक साहाय्यासाठी सयाजीरावांची मदत घेण्याचे ठरवले. १८८१ ला महाराजांनी राज्यकारभार हाती घेतला. पुढे लगेचच १८८३-८४ ला म्हस्केंनी आर्थिक मदतीसाठी सयाजीरावांची भेट घेतली असावी. यासंदर्भात सीताराम तारकुंडे म्हणतात, 'श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची स्वारी पुणे मुक्कामी आली होती. श्रीमंताकडे रा. ब. महादेव गोविंद रानडे, रा. रा. गंगाराम म्हस्के, वकील रा. रा. राजन्ना लिंगू व आणखी दोन तीन सभ्य गृहस्थ यांचे डेप्युटेशन गेले. रा. ब. रानड्यांनी गायकवाड

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १६