पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शिंदेंच्या मनावर पहिल्या भेटीत म्हस्केंचा पडलेला प्रभाव त्यांच्यावरील आठवणीतून व्यक्त होतो.याबरोबरच मराठा जातीवर त्यांचे असणारे उपकार याचीही कल्पना येते.पुण्यासारख्या शहरात त्याकाळात मराठा जातीतील व्यक्तीने आपला प्रभाव कसा निर्माण केला असेल आणि पहिल्या भेटीतील आकलनापेक्षा आपल्याला पुण्याची सर्व माहिती झाल्यानंतर त्यांच्या योग्यतेची कशी कल्पना आली याबद्दल शिंदे पुढे लिहितात,“त्या काळात मराठ्यांत इतका इंग्रजी शिकलेला गृहस्थ हा एकटाच होता.इतकेच नव्हे तर ते वकिलीतही बरेच पुढारलेले आणि तत्कालीन नागरिकात मान्यता पावलेले होते.हे माझ्या तेव्हा लक्षात आले नाही. कारण ही तुलना करण्याइतकी माझी पुण्याची माहिती नव्हती.ज्या म्हस्के साहेबांच्या प्रयत्नाने आज शेकडो मराठे पदवीधर झाले,त्यापैकी एकही आज पुण्यातल्या समाजात अशा मान्यतेने राहत नाही.म्हस्के साहेब त्यावेळी कसे राहू शकले ही मननीय गोष्ट आहे.”

 विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हस्केंचे केलेले अचूक मूल्यमापन आणि गंगारामभाऊंच्या सर्वसमावेशक मान्यतेसंदर्भातील नोंदवलेले वरील निरीक्षण महत्त्वाचे आहे. कारण हे निरीक्षण गंगारामभाऊंच्या ऐतिहासिक स्थानाचे समाजशास्त्रीय मूल्यमापन करते. गंगारामभाऊंचे त्या कालखंडातील सामाजिक आणि राजकीय जीवनातील वजन अधोरेखित करणारी आणखी एक नोंद महत्त्वाची ठरेल. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या अखिल भारतीय स्तरावरील सर्वात महत्त्वाच्या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते.

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २१