पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाहू महाराजांना साहाय्य
 राजर्षी शाहू महाराजांचे महाराष्ट्रातील समाजसुधारणेचे कार्य सर्वपरिचित आहे.परंतु त्यांच्या या कामात सयाजीराव गायकवाडांपासून अनेक महापुरुषांनी नेमके कोणते साहाय्य केले होते याबाबत संशोधन झालेले नाही.इतिहासाचे हे 'मौन' शाहू महाराजांच्या मूल्यमापनातील फार मोठी मर्यादा आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील अपूर्णतासुद्धा आहे.कोणताही महापुरुष अतिशय चिवट अशा प्रस्थापित व्यवस्थेशी जेव्हा संघर्ष करत असतो तेव्हा त्याला अनेक ज्ञात-अज्ञात ‘आधार' लाभलेले असतात.जेव्हा इतिहास अशा आधारांबद्दल अबोल असतो तेव्हा तो इतिहास वास्तवापासून दूर गेलेला असतो.शाहू महाराजांनी केलेल्या समता संघर्षात ‘ढाल' आणि ‘तलवारीची' भूमिका पार पाडणारे महत्त्वाचे लोक गंगारामभाऊंनी तयार केलेले होते.

 राजर्षी शाहू महाराजांचा म्हस्केंशी पत्रव्यवहार होता. वसतिगृह, शिक्षण आणि संस्थानी प्रशासनासाठी शिकलेले लोक मिळवण्यासाठी हा पत्रव्यवहार होत होता. १८९४-९५ च्या दरम्यान शाहू महाराजांनी म्हस्केंना बहुजन समाजातील पदवीधर विद्यार्थ्यांची नावे मागितली होती.यासंदर्भात डॉ. रमेश जाधव म्हणतात, ‘राज्यकारभारात समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेण्याचा शाहू छत्रपतींचा निर्धार कायम होता.ते धोरण त्यांनी आयुष्यभर अमलात आणण्याचे जीवापाड प्रयत्न केले.

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २२