पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९३६ मध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुण्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी महाराष्ट्रातील ७४ संस्थांनी एकत्र येऊन महाराजांचा सत्कार केला होता. मुळात एवढ्या संस्थांनी पुण्यासारख्या ठिकाणी एकत्र येऊन 'बडोद्याच्या' महाराजांचा सत्कार का केला असेल याचा शोध घेणे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा लिहिणे आहे. याच सार्वजनिक सत्कारात महाराजांच्या आर्थिक पाठबळाने १८८३ पासून कार्यरत असलेल्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने महाराजांना ३ जानेवारी १९३६ ला जे मानपत्र दिले त्या मानपत्रात सयाजीरावांचे मराठे आणि महाराष्ट्र यांच्या उत्कर्षात काय योगदान आहे ते जाणून घेणे गरजेचे आहे.

 हे मानपत्र म्हणते, 'महाराजसाहेबांनी केवळ आपल्याच राज्यातील प्रजेच्या उन्नतिप्रीत्यर्थ प्रयत्न केले नसून राज्याबाहेरही सक्रिय सहानुभूती दाखविली आहे. महाराष्ट्रातील ज्या अनेक संस्थांना महाराजसाहेबांनी मदत केली आहे, त्यापैकी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन ही एक होय. या संस्थेस महाराजांनी सन १८८६ सालापासून मदत केलेली आहे व याच मदतीवर आतापर्यंत या संस्थेने मराठा समाजांत शिक्षणप्रसाराचे काम केले आहे. या संस्थेची मदत घेऊन पुष्कळ मराठा गृहस्थ नावारूपास येऊन आज मोठमोठ्या हुद्यांवर कामे करीत आहेत. महाराजसाहेबांनी मराठा समाजात शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी दिलेल्या या उत्तेजनामुळे त्या त्या व्यक्तींचाच उत्कर्ष झाला असे

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २७