पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केले. म्हणूनच सीताराम तावडे म्हणतात, '१८८९ सालापर्यंत या संस्थेला दोनतीन मराठा विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यापलीकडे विशेष भरीव कामगिरी करता आली नाही परंतु पुढे श्री सयाजीराव महाराज गायकवाड यांनी दर साल २४०० रुपये देण्याचा उपक्रम केल्यानंतर डे. मराठा असोसिएशनचे कार्यक्षेत्र वाढले.'

 मराठा जात ही महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठा समुदाय आहे. परंतु त्यातील बहुसंख्य लोक अज्ञान आणि दारिद्र्य यांनी ग्रासलेले होते. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास पाहिला असता आर्थिकदृष्ट्या हा समुदाय सतत संकटात होता. ब्रिटिश भारतात जरी आधुनिक शिक्षण उपलब्ध झाले तरी खालावलेली आर्थिक स्थिती आणि या नव्या शिक्षणाचे महत्त्व या समुदायाच्या फार उशिरा लक्षात आल्यामुळे त्याचा लाभ उठविण्याची दृष्टी मराठ्यांमध्ये नव्हती. या पार्श्वभूमीवर मराठ्यांमध्ये एकूणच शिक्षण आणि मुख्यत: उच्च शिक्षण रुजवण्याचे क्रांतिकारक काम गंगारामभाऊंनी सयाजीरावांच्या पाठबळाने उभे केले. यासंदर्भात १८९४ च्या डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या वार्षिक अहवालात गंगारामभाऊंनी यासंदर्भात आपली कळकळ व्यक्त करताना म्हटले होते, 'डेक्कनमध्ये मराठ्यांची लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या शे.५० पेक्षा जास्त आहे. म्हणून जोपर्यंत ही मराठा जात विद्येत इतर पुढारलेल्या जातींबरोबर आली नाही, तोपर्यंत आपली खरी राष्ट्रीय उन्नती झाली, असे कधीच म्हणता यावयाचे

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ७