पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीराव महाराजांनी नेहमीच स्वच्छ आणि निर्धोक पिण्याच्या पाण्यासाठी आग्रह धरला. वेळोवेळी केलेल्या भाषणात त्यांनी स्वच्छ पाण्याचे महत्त्व पटवून दिले. 'वाईट पाणी प्यायल्याने होणारे पुष्कळ रोग आहेत व त्या रोगांनी होणारी प्राणांची व शक्तीची हानीदेखील मोठी आहे. कॉलरा, विषमज्वर, संग्रहणी, अतिसार असे कितीतरी रोग वाईट पाणी प्यायल्यामुळे होतात. ' दुसऱ्या एका भाषणात म्हणाले, 'वाटेल त्याने वाटेल तसे कपडे व अंग तलावात धुतल्याने पाणी बिघडून त्वचारोगाचे व दुसऱ्या अनेक स्पर्शजन्य रोगांचे जंतू त्या तलावात पैदा होतात. माणसे व गुरेढोरे यांनी घाण केलेले तलावाचे पाणी म्हणजे सौम्य प्रकाराचे गटाराचे पाणीच म्हणता येईल.' पिण्याच्या पाण्याच्या विहिरी या नेहमी सुरक्षित स्थानी असायला पाहिजेत असे त्यांना वाटत होते. 'ज्या विहिरी उथळ, बिनझाकणाच्या आणि निर्जन भागातल्या आहेत, त्यांचे पाणी अपायकारक असते. ते बिघडण्याचा फार संभव असतो.

 विहिरींच्या पाण्याचा उपयोग लोक पिण्यासाठी करतात म्हणून तलावाच्या पाण्यापेक्षा त्याने अधिक अपाय होतो. ते बिघडण्याची कारणे असंख्य आहेत. मुख्यत: गटारांतून वाहत येणारे पाणी किंवा पावसाने वगैरे जमिनीवरून वाहत आलेले पाणी, आत शिरून आणि पालापाचोळा, किडेमुंग्या, पशुपक्षी व कधी कधी माणसेही आत पडून ते पाणी घाण होते. विहिरीला झरे असतात तेथे अप्रत्यक्षपणे उकिरडे, शेतखाने, घाणीची

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / १२