पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकर्षण महाराजांचे गुरु इलियट सर यांच्यामुळे निर्माण झाले होते. सयाजीरावांच्या १८८७ च्या पहिल्या युरोप दौऱ्याचे नियोजन इलियट सरांनीच केले होते. पहिल्या युरोप दौऱ्याचा महाराजांच्या दृष्टीकोनावर फार मोठा परिणाम झाला. या युरोप दौऱ्यात महाराजांनी युरोपातील उद्योग, शेती, शिक्षण, साहित्य, शिल्पकला याबाबतची प्रगती पाहिली आणि या सर्व बाबी आपल्या संस्थानात कशा रुजविता येतील याचा ध्यासच घेतला. पुढे प्रत्येक परदेश वारीनंतर महाराजांनी काहीनाकाही सुधारणा आपल्या राज्यात घडवून आणल्या.
 महाराज आपल्या परदेश प्रवासाबद्दल मत व्यक्त करताना म्हणतात, ‘परदेश पर्यटन करणे हे ज्ञानाचे मुख्य साधन आहे, हे मला पहिल्या विलायत प्रवासाने उमजले. यापुढे जगभर प्रवास करायचा, जगात जे जे चांगलं आहे ते माझ्या बडोद्यांसाठी आणायचे मी ठरविले आहे. या प्रवासानं मला निश्चिंत वाटू लागलं आहे की, आपल्या देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक शिक्षणाची खास आवश्यकता आहे. यामुळेच परदेशात उद्योगधंद्याची अपार वाढ होत आहे. ते शिक्षण घेण्याकडे आपण लक्ष पुरवावे तितके थोडेच आहे." महाराजांच परदेश प्रवासाबाबतच्या वरील दृष्टीकोनात आपल्याला प्रागतिक बडोद्याची बीजे दिसतात.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ११