पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराज जरी आरोग्यासाठी परदेशवाऱ्या करत राहिले तरी अगदी पहिल्या परदेश दौऱ्यापासूनच शास्त्रीय शिक्षणाचा परदेशी आदर्श त्यांना महत्वाचा वाटत होता असे दिसते. भारतातील तोपर्यंतचे शिक्षण आणि परदेशातील शास्त्रीय शिक्षण यांचा तुलनात्मक विचार ते सतत करत असत. या विचारातच त्यांना आपल्या देशाच्या अधोगतीच्या आणि परदेशातील प्रगतीच्या कारणांचा शोध लागला. यासंदर्भात महाराज म्हणतात, 'हिंदुस्थानात शास्त्रीय शिक्षणाची फार उपेक्षा झालेली आहे, म्हणून आपण आपल्या देशातील माणसांना शास्त्र व कला शिकण्यासाठी परदेशात पाठविले पाहिजे. तेथील पद्धती शिकून येण्याची संधी त्यांना दिली पाहिजे. विशेषत: औद्योगिक शिक्षणाच्या बाबतीत गोष्ट फार अवश्य झाली आहे.
माझ्या अलीकडील युरोप व अमेरिकेतील प्रवाहामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. की, आपल्या देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी औद्योगिक शिक्षणाची खास आवश्यकता आहे. परदेशात उद्योगधंद्याची जी अपार वाढ होत आहे, ते शिक्षण घेण्याकडे आपण तितके लक्ष पुरवणे आवश्यक आहे. पुढील अनेक वर्षे अथवा पिढ्यांपर्यंत आपल्याकडील तरुण लोकांना युरोप, अमेरिका जपान वगैरे देशात पाठवावे लागेल. त्या देशातील नवीन ज्ञान, नवीन कल्पना व नवीन संस्कृती आपण आत्मसात केली पाहिजे. आपले राष्ट्रीय व सामाजिक ऐक्य साधून उपरोक्त देशातील पुरुषांच्या परिश्रमांचे,

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १२