पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्थानिक राज्यकारभाराबाबतच्या वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे महाराजांना सादर करणे तसेच इंग्लंडमधील सर्व नियतकालिकात भारताविषयी आलेले लेख जमा करून फाईल करणे असे आदेश दिले. याच कालावधीत सर इलियट यांच्याकडून बारखळी प्रशासनासंदर्भातील अहवाल तयार करून घेऊन छापून घेतला. या दौऱ्यातील सर्वात क्रांतिकारक निर्णय म्हणजे महाराजांनी बडोद्याच्या मिनिस्टरला पत्र लिहून 'त्यांनी भारत सोडण्यापूर्वी किमान १०० गावांमध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करावी. निवडणुकीद्वारे ग्रामपंचायतींची स्थापना ही योजना मला संपूर्ण राज्यभर लवकरच लागू करायची आहे.' असा सर इलियट यांना निरोप दिला. याच पत्रात महाराज पुढे म्हणतात, ' ही योजना माझ्या राज्यामध्ये सुधारणा करण्याच्या मार्गावरील मैलाचा दगड ठरेल.'

 या दौऱ्यातील सक्तीच्या शिक्षणासंदर्भातील पुढील आदेश महाराजांचा सक्तीच्या शिक्षणाबाबतची महाराजांची तळमळ व्यक्त करतो. 'अमरोली प्रांतात जे सक्तीचे शिक्षण सुरू करण्यात आले, त्याचे समाधानकारक परिणाम पाहून महाराजांना आनंद झाला. आता महाराजांची अशी इच्छा आहे की, सक्तीच्या शिक्षणाचे कार्य हे संपूर्ण प्रांतामध्ये सुरू करण्यात यावे. याचे पूर्ण अधिकार हे अँग्लो इंडियन व्हनाक्युलर एज्युकेशन यांना देण्यात यावेत, त्याचा त्यांनी तारतम्याने वापर करावा. या कामामध्ये अडचणी येणार आहेत हे नक्की; पण कोणत्याही समस्यांना

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३६