पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बारखळी विभागातील प्रश्न हा एक महाराजांच्या चिंतेचा विषय होता. सर इलियट यांचा या क्षेत्रातील अनुभव विचारात घेऊन या विभागाची जबाबदारी इलियट यांनी स्वीकारायची आज्ञा महाराजांनी दिली. याच दौऱ्यात जिनेव्हा येथून आणखी एक महत्वपूर्ण आदेश दिला होता तो म्हणजे युरोप प्रवासादरम्यानचा महाराजांचा सर्व पत्रव्यवहार हा मराठीत भाषांतरित करून खंड रूपाने प्रकाशित करावा.

 १. फायफी लिखित 'आधुनिक युरोपचा इतिहास' या पुस्तकाचे शिक्षण विभागाच्या वतीने गुजरातीमध्ये भाषांतर करावे. सोप्या भाषेत केलेल्या या भाषांतरामध्ये प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्न द्यावेत.

 २. मि. खराड़ी हे लंडनमध्ये लोखंडी अलमारी बनवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या जोडीला अजून एक तरुण पाठवावा. ज्याला इंग्रजी चांगले समजत असेल असा म्हणजे मग त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी मर्यादित होऊन काम लवकर होईल.
 ३. सहावी व्हर्नाक्युलर परीक्षा पास झाल्याशिवाय बोर्ड परीक्षेचे प्रमाणपत्र देऊ नये, असे महाराजांना वाटते.

 ४. मी 'अन्न' या विषयावरचे एक पुस्तक पाठवत असून, व्हर्नाक्युलर संस्थेच्या संचालकांनी सोप्या गुजरातीमध्ये भाषांतरित करावे आणि गृहशास्त्र पाठशालेस द्यावे. याच पुस्तकात भारतीय अन्नाबाबत माहिती द्यावी. हे आदेशसुद्धा या दौऱ्यातील आहेत.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ३८