पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पंधरवड्यातून एकदा जनतेसाठी सोप्या पद्धतीने १. घरगुती स्वच्छता, २. आणि अपघाताच्या वेळी काय करायचे याविषयी भाषण द्यावे. ही व्याख्याने स्थानिक भाषेत द्यावी आणि सहा महिन्यांनंतर ती पुस्तकाच्या स्वरूपात छापून घ्यावीत. स्थळ आणि वेळेची सूचना लोकांना द्यावी म्हणजे ते या भाषणाचा लाभ घेऊ शकतील. स्थळाच्या बाबतीत म्युझियम जवळच्या पार्कची मी शिफारस करीन. त्यानंतर या विषयीची परीक्षाही घेता येईल. प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनी या आदेशाचे नीट पालन होते आहे किंवा कसे याकडे लक्ष द्यावे. इकडे लंडन आणि इंग्लंडच्या इतर शहरांतून ही पद्धत अवलंबिली जाते आणि आपणही तिचे अनुकरण करावे असे वाटते. शक्य असेल तर त्यात सुधारणाही करावी.' महाराजांचे हे स्मरणपत्र म्हणजे कुटुंबप्रमुखाने ज्याप्रमाणे कुटुंब सदस्यांचा विचार करावा असाच काहीसा प्रकार आहे.
सातवा प्रवास : १९०५
प्रकृती व मानसिक आनंदासाठी ८ महिन्यांचा सहावा युरोप प्रवास करून ११ जानेवारी १९०१ रोजी आल्यानंतर महाराज ४ वर्षे १ महिने २० दिवस बडोद्यात होते. त्यानंतर सातव्या परदेश वारीसाठी ०१ एप्रिल १९०५ ते १६ नोव्हेंबर १९०६ अशा २० महिना १५ दिवसांच्या इंग्लंड दौऱ्यावर गेले. सहाव्या परदेश दौऱ्याने महाराजांच्या आरोग्यावर योग्य तो परिणाम घडवून आणला. फेब्रुवारी १९०१ मध्ये महाराजांनी त्यांच्या संस्थानातील

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ४२