पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुचविले. त्यानुसार २३ सप्टेंबर १९१९ ला महाराज युरोपला जायला निघाले. त्यापूर्वी राजपुत्र जयसिंहराव गंभीर आजारी असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १५ सप्टेंबरला त्यांना उपचारासाठी इंग्लंडला पाठविण्यात आले. महाराजांच्या लंडनमधील वास्तव्यात दोन दुःखद घटना घडल्या. त्या म्हणजे राजकुमारी पद्मावती आणि युवराज शिवाजीराव यांचे निधन झाले. या घटनांमुळे महाराज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पुर्णपणे खचले असल्याने काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

 राजकुमारी लक्ष्मीदेवी राजे यांच्या शिक्षणाची व्यवस्था स्टॅनमोर भागातील 'बेंटली प्रायओरी' या शैक्षणिक संस्थेत करण्यात आली. इंग्लंडच्या वरिष्ठ सभागृहात अमृतसर प्रकरणावर होणारी चर्चा ऐकण्यासाठी महाराज गेले होते. राजपुत्र प्रतापसिंह यांच्या शिक्षणासाठी महाराजांनी लंडनमधील अनेक शाळांची माहिती घेतली होती. शेवटी श्री. रूज यांच्या सल्ल्याने ईस्टबर्गमधील टेम्पल ग्रोव्ह शाळेची निवड केली. राजपुत्र जयसिंहराव यांना उपचारासाठी जर्मनीला पाठविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. २३ सप्टेंबर १९९९ ते ५ फेब्रुवारी १९२० अशी ५ महिने १३ दिवसांची इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या देशांमधील महाराजांची ही परदेश वारी होती.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५२