पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिलेल्या अहवालानुसार अल्दवर्थ येथील बंगला २५,००० पौंड तर रस्सेल येथील बंगला ३०,००० पौंडांना विकण्याचे ठरले. परंतु अल्दवर्थ येथील बंगला योग्य किंमत न मिळाल्याने विकला गेला नाही. तर रस्सेल येथील बंगला ३०,००० पौंडांना विकला गेला. पॅरिसमध्ये असताना सयाजीरावांनी श्री. एस. एस. गायकवाड यांची चिटणीस म्हणून नेमणूक केली. रॉजर अँड गॅलट या अत्तराच्या कारखान्याला महाराजांनी भेट दिली. अत्तर तयार करण्यापासून ते वितरणापर्यंतची सर्व प्रक्रिया महाराजांनी बारकाईने समजून घेतली. महाराज आपली १८ महिने २५ दिवसांची ही युरोपवारी संपवून २० नोव्हेंबर १९२५ ला भारतात परतले.

सोळावा प्रवास : १९२६
 सयाजीराव १३ मार्च १९२६ ला इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर निघाले. यावेळी सयाजीराव पॅरिस येथील आपल्या नवीन घरात राहिले होते. परंतु पॅरिसमधील वास्तव्यात त्यांना संधीवाताचा प्रचंड त्रास झाला. जवळजवळ अडीच महीने महाराज या आजाराने त्रस्त होते. महाराजांनी डॉ. मोडक यांना फ्रेंच डॉक्टर काही रोगांचा प्रतिबंध व उपाय कसा करतात याचा अभ्यास करण्यासाठी काही काळ पॅरिसमध्ये थांबवले. येथील कॉन्वेंट भेटीवेळी सयाजीरावांनी तेथील कार्यशाळेस काही रक्कम दान दिली. रॉयल अॅकॅडमी ऑफ लंडनला

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५७