पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव आणि

ज्ञानमार्गी जगप्रवास

 ब्रिटीश आगमनानंतर वेगवेगळ्या कारणाने भारतीयांचे परदेश पर्यटन सुरु झाले. यातील पहिल्या टप्प्यात शिक्षणाच्या निमित्ताने भारतीयांच्या युरोपवाऱ्या सुरु झाल्या. ब्रिटीश साम्राज्य, अमेरिकन आणि युरोपियन मिशनरी यांनी परदेशवाऱ्यांना प्रेरणा आणि बळ दिले. परदेशी लोकांनी भारताला भेट देऊन या प्रवासाचे वृत्तांत लिहून ठेविले आहेत. आज आपण अशा लेखनाकडे ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणून पाहतो. प्रवास माणसाला शहाणा करतो हे आपण अगदी दैनंदिन प्रवासातूनदेखील अनुभवलेले असते. हा प्रवास आपल्याला खऱ्या अर्थाने शहाणे तेव्हाच करतो जेव्हा आपण आपल्या मातृभूमीपासून जास्तीत-जास्त दूरचा प्रवास करतो. साधारण: १८८० च्या दशकानंतर आपल्याला भारतीयांच्या परदेशी प्रवासाचे लेखन उपलब्ध आहे. ती प्रवासलेखने चाळली असता परदेशात आपण काय पाहिले याची वर्णने आणि त्या देशांची भलावना करणारी अशीच प्रवास लेखने आपल्याला जास्त आढळतात.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६