पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवून २०० पौंडांची देणगीही दिली. या संस्थेने सयाजीरावांना संस्थेचे आश्रयदाते बनविले. १२ नोव्हेंबर १९३० ला ब्रिटनचे सम्राट यांच्या हस्ते हाऊस ऑफ लॉर्डसच्या दालनामध्ये गोलमेज परिषदेची सुरुवात झाली. यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर सयाजीरावांनीही भाषण केले. या परिषदेच्या ८, ९, १२, १४ आणि १५ जानेवारीला झालेल्या सर्व बैठकांना सयाजीराव हजर होते. १९ जानेवारी १९३१ ला गोलमेज परिषदेच्या समाप्तीवेळीही सयाजीरावांनी भाषण केले. सयाजीरावांनी सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे त्यांना दि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेची फेलोशिप प्रदान करण्यात आली. महाराजांनी या संस्थेला त्यांच्या व्यक्तीगत निधीतून १,००० पौंडांची देणगी दिली.

 या दौऱ्यात महाराजांनी प्रा. अलेक्झांडर गिडोनी यांना कलेवर आधारित एक पुस्तक लिहिण्याची सुचना केली. शाळेत वापरण्यासाठी या पुस्तकाचा हिंदीमध्ये अनुवाद करण्याची महाराजांची इच्छा होती. लंडनमध्ये महाराजांनी “ब्रिटिश स्पोर्टसमन” या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सहाय्य म्हणून त्या पुस्तकाच्या एका संचाला ५२५ पौंडांची ऑर्डर दिली. सयाजीरावांनी परदेशात स्थापत्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मुंबईच्या जी. बी. म्हात्रे या विद्यार्थ्याला २० पौंडांची मदत केली. त्याचबरोबर व्ही. माधवराव आणि भुवन मोहन मंडल या भारतीय विद्यार्थ्यांना परतीची तिकिटे महाराजांकडून काढून

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६३