पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाविसावा प्रवास : १९३३
 महाराज आपल्या बाविसाव्या युरोप दौऱ्यावर २२ मे १९३३ ला मुंबईहून निघाले. सयाजीराव लंडनमध्ये असताना २५ जून १९३३ ला डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली. १५ जुलैला लिंडफिल्ड येथे महाराजांची सर विल्यम व श्री. बनेट यांच्यासोबत भारतातील प्रसारणाच्या समस्यांबद्दल चर्चा झाली. यावेळी सयाजीरावांनी बडोद्यात आकाशवाणी केंद्र उभारण्याच्या शक्यतेवरदेखील चर्चा केली. या संदर्भातील आवश्यक कागदपत्रे व नकाशे महाराजांना दाखवून अशी प्रणाली सुरू करण्याचा फायदा समजावून सांगण्यात आला. सयाजीरावांनी श्री. बनेट यांना याविषयी दिवाणांशी चर्चा करण्याचे आदेश दिले. यानंतर लगेचच १८ जुलैला महाराजांनी लंडनमधील आकाशवाणी केंद्राला भेट दिली.
 २७ ऑगस्टला सयाजीरावांच्या हस्ते शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेमध्ये विविध देशातील विविध धर्माचे २६,००० प्रतीनिधी उपस्थित होते. यावेळी सयाजीरावांनी केलेले भाषण अमेरिकेतील वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आले. विश्व संमेलनाचे अध्यक्ष रुफूस डावेस यांच्या निमंत्रणावरून महाराजांनी २८ ऑगस्टला शिकागो येथेच भरलेल्या विश्व संमेलनाला भेट दिली. न्यू मेक्सिकोमधील भारतीय तरुणांना महाराजांनी १०० डॉलरची देणगी दिली. महाराजांनी लॉस एंजिल्स येथील केट शाळेला

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६६