पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिणामी प्रशासकीय जबाबदारी पार पाडत असताना सतत नवे शिकण्याचा ध्यास त्यांनी घेतला. १८८० ला त्यांचा पहिला विवाह झाला आणि पाचच वर्षात त्यांच्या पत्नी चिमणाबाई पहिल्या यांचे निधन झाले.
 १८८१ पासून अंगावर पडलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडण्याच्या ध्यासातून केलेले शारीरिक आणि बौद्धिक श्रम, त्याचबरोबर पहिल्या पत्नीचा अकाली मृत्यू याचा परिणाम म्हणून सयाजीरावांना निद्रानाशाचा विकार जडला. भारतात अनेक उपचार करूनही यावर उपाय निघाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना हवा पालट आणि उपचार यासाठी युरोपला जाण्याचा सल्ला दिला. त्यातून आरोग्याच्या स्वास्थ्यासाठी महाराज आयुष्यभर परदेश प्रवास करत राहिले. हे जगप्रवास सयाजीरावांच्या बौद्धिक विकासाला, वैश्विक दृष्टीला आणि तुलनात्मक विचार क्षमतेला क्रांतिकारक योगदान देणारे ठरले. त्याचबरोबर सयाजीरावांच्या बडोदा संस्थानाबरोबरच भारताच्या आधुनिकीकरणासाठी आणि विकासासाठीसुद्धा उपकारक ठरले. १८८७ पासून ते १९९५ पर्यंतचे महाराजांचे जगप्रवास बडोद्याला इतर ५६४ संस्थानांबरोबर ब्रिटीश भारताच्या पुढेसुद्धा आदर्श निर्माण करण्याइतके उपकारक ठरले.

 महाराजांचे हे २६ परदेश प्रवास डोळ्याखालून घातले तर महाराजांनी परदेशात कोणत्या संस्था, व्यक्ती, ठिकाणे यांना भेटी दिल्या हे कळते. महाराजांनी आपल्या परदेश प्रवासातून

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ९