पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तसेच नाटककार शंकर मोरो रानडे यांच्याकडे संवाद व कथानक लेखन याचे शिक्षण घेतले. त्याबरोबर त्यांनी वडिलोपार्जित कीर्तन कलापण जोपासली. त्यात त्यांना गाणे अन् अभिनय या कौशल्याची साथ मिळाली.

 कलाभवनचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी गोधा येथे फोटोग्राफीचा स्टुडिओ उभारला. स्वतःचा व्यवसाय सुरू केला; परंतु त्यात अपयश आले. इ. स. १९०० मध्ये गोध्रा येथे प्लेगची भयानक साथ पसरली होती. त्यात दादासाहेबांच्या पत्नीचा मृत्यू झाला. ते परत बडोद्यात आले. ते त्यावेळेस नीळकंठेश्वर महादेवाच्या परिसरात राहत असत. तिथे त्यांनी परत छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला. अधिक अर्थार्जन होण्यासाठी त्यांनी नाटक कंपन्यांचे पडदे रंगवून देण्याचे काम सुरू केले होते. कलाभवनात विविध कलाशिक्षणाचा त्यांना आयुष्याच्या उमेदीच्या काळात अर्थार्जन करण्यास उपयोग होत होता. महाराजांनी आपल्या प्रजेला नेहमीच नवनवीन अनुभव दिले. देशविदेशमधले कलाकार मंडळी बडोद्यात निमंत्रित केले जात होते आणि बडोद्यात कलेला प्रतिष्ठा आहे याची ख्याती देशभर पोहोचल्याने कलाकारांनाही येथे येण्याची ओढ असे. त्याच सुमारास बडोद्याला एक जर्मन जादूगार आला होता. नेहमीच नवीन कला शिकण्याची दादासाहेबांची सवय त्यांना आताही गप्प बसू देत नव्हती. त्यांनी या जर्मन जादूगाराशी परिचय करून घेतला. त्यांची त्याच्याशी चांगली मैत्री झाली.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १४