पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माल मागविण्यासाठी नोंदणीही केली व ते भारतात परतले ( १ एप्रिल १९१२). तेथील वास्तव्यात प्रसिद्ध चित्रपट निर्माते सेसिल हेपवर्थ यांच्याशी त्यांचा परिचय झाला. सर्व सामग्री मे महिन्यामध्ये हाताशी आल्यावर प्रयोगादाखल जून-जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा एका मिनिटाचा लघुपट तयार केला. काही निवडक व्यक्तींना दाखवला. त्याचा योग्य परिणाम वाटल्याने पत्नीचे दागदागिने गहाण ठेवून भांडवल उभे करून लवकरच मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली. सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये त्यांनी निर्मिलेला 'राजा हरिश्चंद्र' हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट इ.स. १९९३ ला तयार केला आणि भारतात चलचित्रांचा आरंभ झाला. फाळकेंच्या 'राजा हरिश्चंद्र' चं बजेट त्या काळी १५ हजार रुपये होते असं म्हटले जाते.

 राजा हरिश्चंद्रच्या यशाने खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपटसृष्टीचा एक व्यवसाय म्हणून पाया रचला गेला. या चित्रपटाकरिता लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कलादिग्दर्शक, संकलनकार, रसायनकार इ. सर्व भूमिका दादासाहेबांनी स्वतःच पार पाडल्या. या चित्रपटांनंतर त्यांनी मोहिनी भस्मासुर (१९९३), सत्यवान सावित्री (१९१४) या चित्रपटांची निर्मिती केली. यांनाही चांगले व्यावसायिक यश लाभले.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १८