पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटते. माझ्या कलाभुवनाच्या अनुभवाने मी आणि माझ्या तरुण मित्रांनी ज्या प्राथमिक पण आवश्यक गोष्टी शिकण्यास उद्युक्त झालो, त्याबद्दल मला तुम्हाला सांगावेसे वाटते. या सर्व गोष्टी मला कलाभवनच्या वास्तव्यातच मिळालेली शिकवण आणि अनुभव याचेच फळ आहे. चित्रपट व्यवसायात शिरायचे मी जे धाडसी पाऊल उचलले, त्याने मला देशातच नव्हे तर सर्व आशियात कीर्ती मिळवून दिली. माझ्या चित्रपटाचे चित्रीकरण इंग्लंडमध्ये झाले. त्याबद्दल जगप्रसिध्द समीक्षक चू यांची प्रशंसा त्यांच्याच शब्दात सांगायची झाली तर ते म्हणतात, “तांत्रिक दृष्टीने पाहता फाळकेंचे काम आश्चर्यकारकरीत्या उत्कृष्ट झाले आहे. आम्हाला तर वाटते की, श्री. फाळके इंग्लंडमध्ये कुठेतरी जन्माला यायला पाहिजे होते,"

 महाराजा सयाजीरावांचे बडोदा हे असे शहर होते की, जेथे मला चित्रपटनिर्मितीसाठी लागणारी मूलभूत साधने मिळाली. माझ्या तेथील वास्तव्यात श्री. सयाजीराव वाचनालयाचा जेवढा चांगला उपयोग मी केला तेवढा फार कमी लोकांनी केला असेल. श्रेष्ठ मराठी नाटककार शंकर मोरो रानडे माझे नाट्यकलेचे गुरू होते. बाबासाहेब रानड्यांसारख्या चौकस व दूरदृष्टी असलेल्या माणसाने माझ्यातला कवी व नट बरोबर हेरला. त्यांनी माझ्या गुणाचा मन लावून विकास केला. वेणीसंहार नाटक महाविद्यालयाने सादर केले. त्या वेणीसंहार नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी साहजिकच माझ्यावर येऊन पडली.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / २५