पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



एकमेव प्रशासक हा सिद्धांत प्रस्थापित करणारा हा 'महाग्रंथ ' सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडविण्याचा बायबल ठरावा. जगातील कोणत्याही राज्यकर्त्याला राज्य कसे करावे हे शिकवणारा हा ग्रंथ प्रत्येक राज्यकर्त्याने वाचला पाहिजे.

 या दौऱ्याच्या शेवटच्या टप्यात नवसारी प्रांतातील सानखेडा या ठिकाणी ओरसंग नदीवरील धरणाच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी महाराजांनी केलेले प्रदीर्घ भाषण म्हणजे 'दुष्काळ निवारणाचा जाहीरनामा'च आहे. या भाषणात महाराजांनी दुष्काळाची कारणे आणि त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना तसेच अशा संकटांना सामोरे जात असताना आवश्यक मानसिकता या मुद्यांना अधोरेखित केले आहे. या प्रसंगी तीन प्रकारच्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. पहिली उपाययोजना म्हणजे तात्कालिक मदत म्हणून धान्य वाटप, अनाथगृहे उघडणे, वस्त्र पुरवठा करणे इ., दुसरी उपाययोजना म्हणजे जलदगतीने संपर्कासाठी रस्ते, रेल्वे या वाहतूक व्यवस्थेच्या निर्मितीला प्राथमिकता देणे, तिसरी उपाययोजना म्हणजे कायमस्वरूपाच्या सोयी म्हणून दुष्काळी कामात प्राधान्याने विहीर खोदणे, पाटबंधाऱ्याची कामे करणे, कालवे काढणे इ. विशेष म्हणजे हे भाषण करण्याअगोदर या ४ महिन्यांच्या दौऱ्यात महाराजांनी ४८ विविध आदेश काढून या तिन्ही प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. येथे आवर्जून नोंदवावी अशी बाब म्हणजे या ४ महिन्याच्या दौऱ्यात महाराज आपल्या सोबत तुकारामाची गाथा घेऊन फिरत होते.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / ११