पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामात समाविष्ट केले. भारताच्या इतिहासात या कल्पकतेला तोड नाही. याबाबतची आपली भूमिका नोंदवताना महाराजा म्हणतात, “इजिप्त, ग्रीस, इटली, पॅलेस्टाईन या ख्यातकीर्त नगरींच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी जो आदर्श घालून ठेवलाय त्याचे आपण अनुकरण करू नये काय ?” महाराजांचे हे चिंतन ११९ वर्षांपूर्वीच्या पार्श्वभूमीवर विचारात घेता किती वैश्विक आणि कालातीत होते हे वेगळे सांगायला नको.
आर्थिक व्यवस्थापन

 १८९८ ते १९०० या दोन वर्षांतील दुष्काळ कामांचा खर्च एक कोटी रुपयांवरून अधिक झाला होता. एवढी रक्कम उभारताना खानगी खात्यातून रक्कम वळती केली. दिवाणखाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारी सोन्याचे दोन सिंह होते. ते वितळून सोने विकले. ती रक्कम दुष्काळी कामाकडे वळती केली. या उदाहरणातून महाराजांच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा परिचय होतो. महाराज जेव्हा म्हणतात, “दुष्काळ आणि आपत्ती हा दैवाचा भाग नाही. तो मानवनिर्मित आहे. निसर्गनिर्मित तर मुळीच नाही, पुरेशा नियोजनाचा अभाव आणि माणसांच्या आंधळ्या वृत्तीमुळे वारंवार दुष्काळास तोंड द्यावे लागत आहे. या दुष्काळाचे व्यवस्थापन नीट करणे ही राजाची खरी कसोटी आहे. माणसांना अन्न-वस्त्र पुरविण्याचे काम आपण करतोच; पण त्याचबरोबर गुरे-ढोरे खाटिकखान्यात जाणार नाही, ही आपलीच जबाबदारी आहे, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था केली पाहिजे. जेथे हे

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १३