पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहज उपलब्ध होईल तेथे गुरांचे स्थलांतरही करावे." तेव्हा त्यांच्यातील मानवी आपत्तींचा 'वैज्ञानिक' दृष्टीने शोध घेणारा आणि त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करणारा 'तर्कनिष्ठ' प्रशासक भेटतो.
 महाराजांच्या या पुस्तकाचे एक खास वेगळेपण म्हणजे या पुस्तकाचे परिशिष्ट होय. या परिशिष्टाचा उद्देश दुष्काळी कामात ज्यांनी ज्या-ज्या कामाच्या संदर्भात उपयुक्त सेवा दिली त्यांची कृतज्ञतापूर्वक दखल घेणे हा आहे. आजच्या काळात तर नेतृत्वस्थानी असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम हे परिशिष्ट करते. यामध्ये १६ व्यक्ती आणि संस्था यांनी केलेली आर्थिक मदत रकमेच्या उल्लेखासह दिली आहे. संस्थानी सेवेतील दिवाणापासून ते अगदी छोट्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना श्रेय देण्यात आलेले आहे. या दुष्काळनिवारणाच्या कामात खासेराव जाधव, सत्यशोधक रामचंद्र धामणस्कर आणि आवटे तसेच अप्पासाहेब मोहिते या अधिकाऱ्यांनी जीवाचे रान करून महाराजांची साथसंगत केली. ज्याप्रमाणे शिवरायांना निष्ठावान सहकारी लाभले त्याचप्रमाणे सयाजीरावांनीही अशी निष्ठावान रत्ने शोधून सांभाळली. प्रसंगी महाराजांच्या मताविरुद्ध असणारी त्यांची मते स्वीकारली. विशाल दृष्टीने ग्रंथ आणि विद्वान यांच्याशी सावलीसारखी मैत्री केली. त्यामुळेच त्यांच्या या ग्रंथाच्या सर्वाधिक आवृत्या जगावर राज्य करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशातून निघतात हा 'योगायोग' नाही.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १४