पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराजांनी या ४ महिन्यांच्या दुष्काळ दौऱ्यादरम्यान काढलेले आदेश (एकूण ४८)
 १) दुष्काळी कामावर जाण्यात कमीपणा वाटणाऱ्या भूमिहीन व मालमत्ताहीन लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी तीस रुपयांपर्यंतची रक्कम विनातारण तगाई कर्जरूपाने देण्याचा आदेश.
 २) एकनकडी व फरतानकडी या खेड्यातील दुष्काळामुळे रोजगार गमावलेल्या नागरिकांच्या उदरनिर्वाहासाठी एक लाख रुपये रकमेची तगाई देण्याचा आदेश.
 ३) तांब्याची प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या विसनगरमधील बेरोजगार तांबट कारागिरांना देण्यात येणारी तगाईमधील २००० रु. ची रक्कम आगाऊ देण्याचे आदेश.
 ४) महसुलातील वरिष्ठ अधिकारी व वहिवाटदारांना खेडीपाडी पिंजून काढून निराधार व्यक्तींना मदत करण्याची सूचना महाराजांनी केली. निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी सुभा व वहिवाटदारांना अनुक्रमे १०० व ५० रु. निधी मंजूर करण्याचा अधिकार देण्याचा आदेश. आधीचा निधी संपल्यानंतर नवीन निधी देण्याची तरतूद.

 ५) पाटणच्या गंगाडी तलावाच्या कामावरील शारीरिकदृष्ट्या सशक्त आणि कमजोर अशा दोन्ही प्रकारच्या मजुरांकडून कोणतीही जबाबदारी निश्चित न करता काम करून घेतले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर या मजुरांची काम करण्यास सक्षम व काम करण्याच्या स्थितीत नसलेले

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / १५