पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४) पेटलाड येथे नागरिकांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे शहरात ताबडतोब गरीबखाना सुरू करण्याचा आदेश. नागरिकांनी मागणी न करताच गरीबखाना आणि अन्नछत्रांसाठी १ हजारपेक्षा अधिक रु. ची रक्कम खानगी खात्यातून मंजूर केली.
३५) शिधा कपातीची शिक्षा झालेल्या कैद्यांचा वैद्यकीय देखरेखीचा कालावधी सामान्य परिस्थितीत दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक न ठेवण्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश.
३६) गरजेनुसार गरीबखान्यातील रहिवाशांना देण्यात येणाऱ्या आहारात योग्य तो बदल करण्याचा आदेश.
३७) दुष्काळग्रस्तांना काम उपलब्ध करून देण्यासाठी कोसंबा ते वाकल या तीन मैल लांबीच्या रेल्वेमार्गाचे काम कोणत्याही सर्वेक्षणाविना सुरू करण्याचा आदेश.
३८) दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होऊन जंगली उत्पादनांपर्यंत पोहोचणे शक्य व्हावे यासाठी जंगलातील रस्ते बांधण्याचा आदेश.
३९) सोनगड विभागातील गरीबखान्याच्या खर्चासाठी १०,००० रु. मंजूर करणारा आदेश.
४०) नवसारी विभागातील दुष्काळ जाणवणाऱ्या ठिकाणी लोकांना दिलासा देणारे उपक्रम मोफत राबवण्याचा आदेश.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / २१