पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४१) कालीपरज आदिवासी जमातीच्या करमाफीच्या मागणीबाबत संबंधित विभागाला परिस्थिती पाहून कार्यवाही करण्याचा आदेश.
४२) नवसारी विभागात चालू असलेल्या दुष्काळी कामांमध्ये धनका, चोंधार, नाईकदास, भिल्ल आणि कोकणी जमातींसाठी कामे चालू करण्यास मंजुरी.
४३) ६,००० रुपयांपेक्षा कमी खर्चाचा कोणताही दुष्काळग्रस्तांसाठीचा उपक्रम राबवण्याचा अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना प्रदान करणारा आदेश.
४४) बांबूंच्या चकत्यांपासून चटया आणि मदतकार्यासाठीच्या राहुट्या तयार करण्याच्या कामासाठी ६,००० रु. निधी मंजूर केल्याचा आदेश.
४५) सोनगड येथील लोकांसाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचा आदेश.
४६) व्यारा आणि महुआ जिल्ह्यातील शेतकरी क्यारी (छोटे चौकोन करून) पद्धतीने शेतात पाणी अडवून जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. दुष्काळी कामाच्या योजनेंतर्गत हे काम करण्यासाठी या दोन जिल्ह्यांकरता ३०,००० रु. मंजूर केल्याचा आदेश. कडी आणि बडोदा विभागाप्रमाणेच या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्याचे अधिकार नायब सुभा आणि वहिवाटदारांना देण्यात आले.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / २२