पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाणात गुणवत्तापूर्ण दुष्काळी कामे करून घेण्यासाठी तितकेच आग्रही होते. लोकांच्या उदरनिर्वाहासाठी नवनवीन दुष्काळी कामांना मंजुरी देतानाच संस्थानातील जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी महाराज सातत्याने प्रयत्न करत राहिले. त्याचबरोबर धरणे, विहिरी, रेल्वे, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधांचीदेखील उभारणी महाराजांनी या संकटकाळात केली.
 सरकारी अधिकारी आणि कामगार यांच्या अभद्र युतीमुळे दुष्काळी कामांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये याची काळजी घेणाऱ्या महाराजांनी निकडीच्या वेळी या सरकारी अधिकाऱ्यांना योग्य ते अधिकारदेखील प्रदान केले. स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या अंमलबजावणीस सुरुवात होण्याआधी ५२ वर्षे महाराजांनी बडोद्यात केलेला 'सत्ता विकेंद्रीकरणा'चा हा प्रयोग अपूर्व होता. अधिकाऱ्यांकडून गुणवत्तापूर्ण काम करून घेतानाच परिस्थितीनुरूप त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांसाठी केल्या जाणाऱ्या त्यांच्या वेतनातील कपातीला स्थगिती देण्याचा 'समंजसपणा' सुद्धा महाराजांनी दाखवला.
 स्वतःच्या स्वागतावेळी रयतेने नजराणे न देण्याचा आदेश काढणाऱ्या सयाजीरावांनी केवळ सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी दुष्काळी काम करण्यात कमीपणा मानणाऱ्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती दुष्काळात 'उपाशी' मरणार नाहीत याची काळजी घेतली. स्वतःचा मानमरातब बाजूला

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / २४