पान:महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कमरेत किती वाकावे, आवाजाची पातळी कशी असावी इतके इत्यंभूत तपशील आढळतात. आजच्या आधुनिक हॉटेल व्यवस्थापनाच्या पुस्तकात तरी इतके सूक्ष्म तपशील असतील असे वाटत नाही.

 ही प्रस्तावना करण्याचे कारण असे की पुढे आपण महाराजांच्या ज्या पुस्तकाची चर्चा करणार आहोत त्या पुस्तकात दुष्काळ व्यवस्थापनाच्या सूक्ष्म नियोजनाचे दर्शन आपल्याला घडते. महाराजांचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा हा एक उत्तम स्रोत आहे. कारण या पुस्तकात महाराजांमधील तळमळीचा प्रशासक भेटतो, मानवतावादी संत भेटतो, कठोर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचे दर्शन होते, प्रश्न सोडविण्याअगोदर प्रश्न कसा समजून घ्यावा याचे प्रशिक्षण भेटते. महाराजांच्या मानसशास्त्रीय स्थितीची आणि समाजशास्त्रीय दृष्टीची प्रचितीसुद्धा येते. त्यामुळे एखादा प्रशासक इतका परिपूर्ण असू शकतो हा अनुभव अविश्वसनीय ठरतो. येथे महानशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईनने गांधीजींबद्दल जे विधान केले होते त्याची आठवण होते. आईनस्टाईन गांधीजींबद्दल म्हणाला होता 'गांधी नावाचा एक हाडामासाचा माणूस या पृथ्वीवर वावरला होता यावर भावी पिढी विश्वास ठेवणार नाही'. सयाजीरावांची एकूण कारकीर्द, त्यांचे निर्णय आणि महत्त्वाचे म्हणजे या दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी अभ्यासल्यानंतर हे विधान सयाजीरावांनासुद्धा तंतोतंत लागू पडते असे वाटत राहते.

महाराजा सयाजीराव आणि दुष्काळ दौऱ्याच्या नोंदी / ७