पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नावाखाली भीती दाखवून केले जाणारे अवास्तव धार्मिक विधी बंद करून आर्थिक बचत केली. थोडक्यात, धर्मसुधारणेची सुरुवात स्वतःपासून केली.

 सयाजीराव महाराजांनी इ.स. १८८७ मध्ये समुद्रपर्यटन केल्याने पुरोहितांनी प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडले. वडीलधाऱ्या मंडळींच्या दबावामुळे विधी केला. पुढे त्यांनी २६ वेळा जगप्रवास केला; परंतु पुन्हा कधीही अशा विधींची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. राजवाड्यातील सर्व विधी इ.स. १८९६ मध्ये वेदोक्त पद्धतींनी करण्यास सर्व पुरोहितांना भाग पाडले. यावेळी राजसत्ता विरुद्ध धर्मसत्ता हा वाद निर्माण होऊ पाहत होता; परंतु हा वाद कोणताही गाजावाजा न होता संपवला. नरहर कुरुंदकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, 'सयाजीराव महाराजांनी वेदोक्त प्रकरण राजाप्रमाणे थाटात सोडवले.' हा वाद सोडवताना त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला - हुकूम काढून, सत्तेचा वापर करून दंडुक-दडपशाहीने सर्व विधी करायला पुरोहितांना भाग पाडणे. दुसरा- पुरोहितांनी विधी करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. ती देऊन बिनबोभाट विधींची सुरुवात करणे. (लाच मागितल्याचे रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी नोंदवून ठेवले आहे.) परंतु यापैकी एकाही मार्गाचा अवलंब न करता सर्व प्रकरणाचा मुळातून अभ्यास केला. पुरोहितांना वेदोक्त विधी का करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. धर्म आणि विधी यांचा सखोल अभ्यास केला. सर्व पुरोहितांबरोबर स्वतंत्र

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / ११