पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करण्यास व त्यावरून बोध घेऊन सत्कर्म आचरण्यास शिका. ' असे श्रोत्यांना सांगितले. डॉ. आनंदराव नायर यांनी मुंबईत बांधलेल्या बुद्धविहाराचे उद्घाटन केले. यावेळी भगवान गौतम, त्यांचा धर्म जगातील इतर धर्मांच्या तुलनेत कसा श्रेष्ठ आहे याचे विवेचन केले. इ.स. १९२४ मध्ये बौद्ध धर्माचे अभ्यासक 'पंडित बिनोयतोष भट्टाचार्य' यांना प्राच्यविद्या संस्थेच्या ओरियंटल सिरीजचे प्रमुख केले. काही दिवसांत संस्थेचे संचालक केले. त्यांच्या मदतीने बौद्ध धर्म प्रसाराचे काम फार पुढे गेले.

 बडोदा राज्यात जैन धर्मीयांची लोकसंख्या इतरांच्या तुलनेत अत्यल्प होती. 'अहिंसा व जीवदया या तत्त्वांविषयीचा आदर या लोकांत आजही आढळतो' असे असले तरी जैन धर्मीयांतही अनेक गैरसमजुती असून, त्याशिवाय त्यांच्यात एका विशेष समजुतीचा पगडा तत्कालीन परिस्थितीत अधिक होता. तो म्हणजे 'संन्यासदीक्षा घेऊन यती झाल्याने मनुष्यास अधिक पुण्यप्राप्ती होते.' मूळ धर्माला फाटा देऊन अशा अनेक अज्ञानमूलक जाचक बाबी तयार करून, धर्माचा ठेका काही ढोंगी धर्मवीरांनी स्वतः कडे घेतला होता. याचा गैरफायदा घेत अज्ञानी प्रजेची पिळवणूक सुरू होती. जैन धर्मातील अनिष्ट बाबींना मूठमाती देण्यासाठी १ डिसेंबर १९०४ मध्ये जैन परिषदेचे आयोजन महाराजांनी केले. या परिषदेस उपस्थित राहून उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन केले. जैन धर्मात वडिलोपार्जित संपत्ती हडप करण्याच्या इराद्याने अनाथ बालकांना दीक्षा देऊन संन्यासी बनवले जात होते. अशी अनेक उदाहरणे

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / १५