पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे या प्रज्ञावंत राजाचे अक्षरधन आहे. महाराजांनी निर्मिलेल्या प्रचंड साहित्यात पोटजातीत रोटी-बेटी व्यवहार, ढोंगी संन्यासी आणि बाबालोकांना विरोध, जातीअंत, जातीयता, अस्पृश्यांचे शिक्षण, धर्मांतर, पडदा - गोषापद्धती, बालविवाह निषेध, विधवाविवाह प्रोत्साहन, वर्णवर्चस्ववादास विरोध, सतीप्रथा निषेध, अंधश्रद्धा विरोध, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक समता, बंधुता, सत्पात्री दानधर्म, सामाजिक नीतिमत्ता, विविध धर्मग्रंथांवर भाष्य, अस्पृश्यता उद्धार, धर्मसुधारणा, चिकित्सक धर्मचिंतन, तुलनात्मक धर्मविचार आणि सद्धर्म संकल्पना यावर सुधारणेच्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून भाष्य आहे.

 जागतिक पातळीवरील मान्यवरांनी महाराजांच्या विद्वत्तेबद्दल महनीय विधाने केली आहेत. सर्वप्रथम इ.स. १९०६ मध्ये त्यांनी अमेरिकेला भेट दिली. त्यावेळी लंडनमधील अमेरिकन वकील मि. व्हायट लॉ यांनी अमेरिकेतील 'सेक्रेटरी ऑफ स्टेट' यांना पत्रातून 'महाराज हे फार बुद्धिमान राजे आहेत.' असे मुद्दामहून कळवले होते. लुई ब्रुमफिल्ड या नामांकित साहित्यिकाने एका लेखात म्हटले, 'बडोदा आणि भारत यांचे भाग्य आहे की, इतका भव्य व्यक्तिमत्त्व असलेला राजा त्यांना लाभला आहे. एवढा मोठा देशभक्त आणि इतका साधा माणूस.' याचप्रमाणे स्टेनले राईस, ई.एल. तोतेनहॅम, अल्बन जी. विजेरी, रेव्ह. एडवर्ड विडन, फ्रँक डॉर्ट, न्थनी एक्स. सोअर्स आदी मान्यवरांनी महाराजांच्या विद्वत्तेबद्दल महनीय विधाने केली आहेत. महाराज

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २१