पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एका मजल्यावरील भव्य दिवाणखान्यात संयुक्त अधिवेशन भरविण्यात आले होते. या वेळी भिन्न-भिन्न राष्ट्रांचे व धर्मांचे २६,००० प्रतिनिधी उपस्थित होते. सभागृहात महाराजांनी प्रवेश करताच हा अफाट श्रोतृसमाज उभा राहिला व सर्वांनी हिंदू पद्धतीने महाराजांना नमस्कार करून स्वागत केले.

 महाराजांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना. 'हा सन्मान माझा नसून माझ्या जन्मभूमीचा आहे.' हे प्रारंभीच नम्रपणे नमूद केले. त्यांनी तुलनात्मक धर्म अभ्यासाचे विद्यार्थी बनून अनेक मूळ धर्मग्रंथाचे परिशीलन केले होते. प्रत्येक धर्माची मूळ तत्त्वे आणि ढोंगी धर्मगुरूंनी केलेले सोयीस्कर बदल याचेही त्यांना आकलन होते. त्यामुळे सर्वधर्मांचे प्रतिनिधित्व करताना सांप्रतकाळी सर्व धर्मात परिवर्तन करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. धर्माची जीवनात गरज आहे; पण त्याचवेळी धर्म सुलभ न होता अडगळ ठरत असेल तर त्या धर्माची पुनर्घटना केली पाहिजे याचा साधार आणि जोरदार पुरस्कार या भाषणात केला. 'लोकसत्ता नष्ट करण्याची शक्ती जातीद्वेषात अजून आहे आणि वर्ण व्यवस्थेचा भलताच विपर्यास झाल्यामुळे हिंदुस्थानची अवनती झाली आहे.' अशी हिंदू धर्मावर टीका करताना हिंदू धर्माचे प्राचीनत्व आणि इतर धर्मांच्या तुलनेत असणारे श्रेष्ठत्वही सर्वांसमोर ठेवले. कोणत्याही सद्धर्माचे स्वरूप साधे आणि सरळ असले पाहिजे याचे प्रतिपादन करताना महाराज म्हणाले, 'सामान्य माणसाला आपल्या भाकरीप्रमाणे तो ओळखीचा वाटला पाहिजे.'

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २४