पान:महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्याकाळी आणि आजही धर्माचा संबंध गरिबीनिर्मूलनाशी जोडला जातो. सर्वधर्म परिषदेच्या जागतिक व्यासपीठावरून महाराजांनी हा प्रश्न उपस्थित केला. या भाषणात 'धर्माने गरिबांचे कैवारी व्हावे' असा उपदेश केला. महाराज पुढे म्हणाले, 'चालू काळातले आपल्या पुढचे अत्यंत महत्त्वाचे दोनच प्रश्न आहेत. ‘देशा-देशांत शांतता राखणे आणि दुसरा बेकारीचे निवारण करणे. म्हणून लढाई, लोभ व कायदेशीर लूट यांच्या मुळाशी आणि दारिद्र्य व बेकारी यांच्या मुळाशी घाव घालण्याचे काम धर्म करू शकेल काय?” महाराजांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केल्याचे दिसते. तसेच जगभरातील गरिबांसाठी धर्म किती महत्त्वाची भूमिका निभावू शकतो याचा ऊहापोह केला. कोणता धर्म श्रेष्ठ आणि कनिष्ठ या वादात न अडकता प्रत्येक धर्मातील अनिष्ठ बाबींचा शेवट करण्याची हीच वेळ असल्याचे उपस्थित मान्यवरांसमोर प्रतिपादन केले. 'भौतिकशास्त्रज्ञानी सध्या एका दृष्टीने जगाचे एकीकरण केले आहे खरे; पण सामाजिक, आर्थिक व राजकीयदृष्ट्या त्याचे तुकडे पडलेले आहेत; अशा स्थितीत धर्माला जगताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक ऐक्य साधता येईल की नाही, हा सध्या मुख्य प्रश्न आहे.' महाराजांच्या या प्रश्नावर गेल्या सत्याऐंशी वर्षांत जगभरातील कोणत्याही देशात आणि धर्मात चर्चा झालेली दिसत नाही. आज जगभर झालेला आर्थिक विकास, औद्योगिकीकरण, उन्नती आणि भौतिक क्षेत्रात झालेल्या अमाप उन्नतीच्या पार्श्वभूमीवर कोणताही

महाराजा सयाजीराव आणि दुसरी जागतिक सर्वधर्मपरिषद / २५