पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोसंबी बडोद्यात
 पुढे १९०८ मध्ये जुलै महिन्यात कोसंबींनी बडोद्याला जाऊन सयाजीरावांची भेट घेतली. या भेटीवेळी महाराजांनी कोसंबींना बडोद्याच्या न्यायमंदिरात एक व्याख्यान देण्याची सूचना केली. महाराज स्वतः कोसंबींच्या या व्याख्यानास हजर राहणार होते. परंतु ऐनवेळी काही काम निघाल्याने महाराजांना या भाषणास उपस्थित राहता आले नाही. कोसंबींच्या व्याख्यानानंतर तेथे याचवेळी आणखी काही व्याख्याने झाली त्या व्याख्यानांवरून कोसंबीच्या भाषणाचा चांगला प्रभाव पडला होता हे लक्षात येते.

 या व्याख्यानानंतर कोसंबींची आणि महाराजांची राजवाड्यामध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान कोसंबींना महाराजांनी विचारले, 'कलकत्ता सोडून इकडे काही काम करण्याची तुमची इच्छा आहे काय?” यावर कोसंबी म्हणाले, 'पैसा मिळवून श्रीमंत होण्याची मला मुळीच इच्छा राहिली नाही. माझ्या आवडीचे काम मला मिळाले आणि निर्वाहापुरता पैसा मिळाला तर ते मला हवे आहे.' या उत्तरावरून महाराजांना कोसंबींची भूमिका लक्षात आली. त्यामुळे कोसंबींनी बडोद्यास राहण्यासाठी यावे असे महाराजांना वाटत होते. कोसंबींना पूर्णपणे सहकार्य करण्याच्या उद्देशाने महाराज पुढे म्हणाले, 'तुम्ही येथे येऊन राहात असाल तर तुम्हा मी सर्व प्रकारे मदत करण्यास तयार आहे.' परंतु कोसंबींनी सांगितले की, 'मी बडोद्यालाच राहावे, अशी अट

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १०