पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये मुंबईला गेले. काही काळ मुंबईत राहून मार्च १९०९ मध्ये पुण्यास आले. यादरम्यान कोसंबींनी 'विशुद्धिमार्गाचा' बराच भाग मराठीत लिहून काढला. तसेच त्यांनी 'बोधिचर्या - अवतारा'चे मराठी भाषांतर केले आणि संस्कृत भाषेत क लहानसे पाली व्याकरणदेखील लिहिले. पुढे १९०९ मध्येच धर्मानंदांनी बडोद्यात विविध ठिकाणी बौद्ध धर्मावर ५ भाषणे दिली. त्यातील ३ भाषणे 'बुद्ध, धर्म आणि संघ' या नावाने ग्रंथ रूपाने प्रसिद्ध करण्यात आली. हा ग्रंथ छापण्यासाठी सयाजीराव महाराजांनी कोसंबींना ५०० रु.ची देणगी दिली. सयाजीराव हे जरी बडोदा संस्थानचे राजे असले तरी त्यांना मातृभूमी म्हणून महाराष्ट्राबद्दलची कळवळ अगदी सुरुवातीपासूनच होती. महाराष्ट्रसुद्धा बौद्धिकदृष्ट्या समृद्ध व्हायला हवा ही दृष्टी यामागे होती. बौद्ध धर्माबद्दल फार पूर्वीपासूनच सयाजीरावांच्या मनात आदर होता.

 केळुसकर हे बुद्ध अभ्यासातील कोसंबींची पहिली प्रेरणा होते. या संदर्भात मराठी विश्वकोशातील नोंदीत केळुसकर आणि 'आध्यात्मिक ज्ञानरत्नावली' ही दोन्ही नावे टाळून कोसंबी शिष्य पु. वि. बापट यांनी पुढील विधान केले आहे. १८९७ मध्ये एका मराठी नियतकालिकातील गौतम बुद्धावरील लेख वाचून, त्यांचे बौद्ध धर्माविषयी कुतूहल जागृत झाले.' हे बुद्ध चरित्र १८९७ मध्ये ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली' या मासिकातून प्रथम क्रमशः प्रकाशित झाले होते. कोसंबींना १९०८ ते १९११

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १३