पान:महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रुपयांच्या वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीही पश्चात्ताप झाला नाही. हे वेतन स्वीकारले नसते तर डॉ. वुड्स यांची गाठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधी सापडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नाने मुंबई युनिव्हर्सिटीत पाली भाषेचा प्रवेश करता आला.
 महाराष्ट्र देशबांधवांची सेवा करण्याची माझी उत्कट इच्छा अंशत: तरी तृप्त होण्यास श्रीमंत गायकवाड महाराजांचाच आश्रय कारणीभूत झाला आहे आणि या प्रांतात पाली भाषेच्या प्रसाराचे पुष्कळसे श्रेय त्यांना देणे योग्य आहे.'

 सयाजीरांवाकडून महाराष्ट्राबरोबरच भारतालाही झालेले हे महत्त्वाचे योगदान आजपर्यंत महाराष्ट्राला अज्ञात आहे. कारण कोसंबीची ही अमेरिकावारी महाराष्ट्राबरोबरच भारतालाही लाभदायक ठरली असे आज मागे वळून पाहताना जाणवते. कारण १९१२ मध्ये धर्मानंद अमेरिकेहून परतले. अमेरिकेतून परतल्यानंतर कोसंबींनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नोकरी करावी अशी विठ्ठल रामजी शिंदे यांची इच्छा होती. शिंदेंनी धर्मानंदांची शिफारस करून फर्ग्युसन कॉलेजचे प्रोफेसर केशवराव कानिटकर यांना पत्रही लिहिले. त्यानंतर कोसंबींनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. कारण त्यादरम्यान पुण्यात पाली भाषेच्या प्रसारासाठी ही चांगली संधी असल्याने त्यांना शिंदेंची कल्पना आवडली होती.

महाराजा सयाजीराव आणि धर्मानंद कोसंबी / १५